राज ठाकरे डोंबिवलीत दाखल, मनसैनिकांना मिळणार राजमंत्र
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी डोंबिवलीत दाखल झाले. राज ठाकरे हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून कल्याण डोंबिवलीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महापालिकेतील घडामोडीनंतर मनसैनिकाना कोणता राज मंत्र मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मुंबई महापालिकेतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारपासून तीन दिवस कल्याण – डोंबिवलीच्या दौऱ्यावर येणार होते. गुरुवारी संध्याकाळी ते कृष्णकुंज वरून डोंबिवलीला येण्यासाठी निघाले होते.पण वांद्रे येथील आगीमुळे झालेली प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका राज याना बसल्याने ते पुन्हा माघारी फिरले असे मनसेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी मात्र राज हे सकाळीच डोंबिवलीत दाखल झाले. मनसेचे ज्येष्ठ नेते राजू पाटील, राजेश कदम, विरोधी पक्षनेता मंदार हळबे, शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह अनेकांनी त्यांचे स्वागत केले. डोंबिवली जिमखान्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज यांनी सकाळी जिमखण्याच्या गॅलरीत उभे राहून प्रसन्न मूड मध्ये क्रिकेटचा खेळ पहिला. त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.