मुंबईतील दगा फटक्यानंतर राज ठाकरे
कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर
डोबिवली : मुंबई महापालिकेतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस कल्याण – डोंबिवलीच्या दौऱ्यावर येत आहेत.आपल्या दौऱ्यात ते इथल्या मान्यवरांशी संवाद साधण्याबरोबरच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहेत.
मुंबई महापालिकेतील मनसेच्या 6 नगरसेवकांना शिवसेनेने गळाला लावले. त्यामुळे अवघा एकच नगरसेवक शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे ज्या महापालिकेत मनसेचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी जावून त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे हा त्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. गुरुवारी 26 तारखेला संध्याकाळी त्यांचे डोंबिवली जिमखाना येथे आगमन होणार असून शुक्रवारी सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर मनसेच्या नगरसेवकांशी ते संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर संध्याकाळी ते शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तर शनिवारी 28 तारखेला सकाळी ते कल्याणात येणार असून कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व विधानसभेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.