हा मोर्चा आपला आहे, सहभागी व्हा
राज ठाकरेंचे सेाशल मिडीयातून आवाहन
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी चर्चगेट रेल्वे स्थानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा माझा अथवा माझया पक्षाचा नाही तर आपला आहे अशा शब्दात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मिडीयातून केले आहे. राज ठाकरे तब्बल पाच वर्षानंतर एखाद्या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून मनसे मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. तसेच राज आपल्या भाषणात कुणावर निशाना साधतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष वेधले आहे.
एलफिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीत २३ निरपराध मुंबईकरांचा जीव गेला. ५० हून अधिक जण जखमी झाले. याचा रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता मेट्रो जंक्शनपासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयजवळ मोर्चा विर्सजित हेाणार आहे त्यानंतर राज ठाकरे आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील त्यानंतर राज ठाकरे मोर्चेकरांना संबोधित करणार आहेत. मुंबईतल्या बहुतांश प्रवासी संघटनाही त्यात सहभाग होणार आहेत. मराठी चित्रपट सुष्टीतील अनेक कलाकारांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईकरांनी मोर्चात सहभागी व्हावे यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी लोकलमधून प्रचार केला. मनसेकडून मोर्चासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले असून, सोशल मीडियावरही फोटो शेअर करुन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.