मुंबई : जगाच्या पाठीवर महाराष्ट्र असं एकच राज्य असेल ज्याचे दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्यातला अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष विरोधात. याला काय राज्य म्हणायचं का? नुसते आपले दिवस ढकलले जात आहेत, महाराष्ट्रात सगळी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती, राजकारण मी कधीच पाहिलं नाही. माझ्या आतमध्ये ज्या काही गोष्टी धुमसतायत ना त्या मी योग्य वेळी बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर का़ढणार या सत्ताधाऱ्यांना त्याचे चटके बसणार, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दादरमध्ये मनसेची मुंबई, ठाणे, कोकणमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे, यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी हा हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले की, नागरिकांचा केवळ मतदानासाठी वापर केला जात आहे. राज्यात कायदा नावाची गोष्ट उरलेली नाही. रस्त्यांवर पडलेले खड्डे त्यामुळे होणारं नुकसान याचं कोणाला काहीच वाटत नाही, नागरिकांना याचा राग येत नाही. टोलचा विषय आहेच. आतापर्यंत टोलनाक्यांवर 90 कॅमेरे मनसेचे लागलेले आहेत. किती गाड्या येतात किती जातात हे समजतच नाही. मुंबई, ठाणे RTO मध्ये रोजच्या हजार हजार गाड्या रजिस्टर होतायत आणि टोलवर गाड्या तेवढ्याचं. असं कसं होईल? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. आता टोलनाक्यांवरची येलो लाईन वगैरे बघा, त्यावर लक्ष घाला. येलो लाईनच्या बाहेर गाडी दिसली की डायरेक्ट लंकेला पळवायची, असं राज ठाकरे म्हणाले.

मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही

कोकणात ब्रीज कोसळला. मी आधीच बोललो होतो की सगळ्या ब्रीजचं, फ्लायओव्हरचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवं. पण कोणाचंच लक्ष नाहीये कशाकडे. तुम्ही जगा मरा काहीही करा, मतदानाच्या दिवशी फक्त जीवंत राहा आणि मतदान करून तिथेच मेलात तरी चालेल. लोकांची चिंताच कोणाला नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं.

राज ठाकरे म्हणाले की, किशोर रुपचंदानी याचं इगल कन्स्ट्रक्शन आहे. त्याला १४० करोड रुपयांचं कोकणातलं ब्रीज बांधायला दिलं होतं, ते पडलं. त्यावर केवळ बातमी होते. पुढे काहीही होत नाही. संबंधित मंत्र्याचा कोणी राजीनामाही मागत नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले होते की, महामार्गाची एक लेन सुरू करू. पण ती काही झाली नाही, करोडो रुपये फुकट गेले. त्याच रस्त्यांवर लोकांचे जीव जातायंत. पण काही नाही, या देशात मतदान सुरू आहे. निवडणुका सुरू आहेत. त्याच त्याच लोकांना निवडूनही दिलं जात आहे. ज्या देशातील लोकांना, नागरिकांना राग येत नाही, त्या देशाचं काय करायचं मला समजत नाही, असं म्हणत ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *