मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अनेक आमदारांसह बंड करत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करीत भाष्य केलयं.

असं आहे राज ठाकरेंचं ट्वीट

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *