नाशिक : महापालिका, नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले असतानाच, आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. ‘देशात कुठेही अशी पद्धत अस्तित्वात नसताना महाराष्ट्रातच हे का केलं जातंय? आम्ही यावर आवाज उठवतोच आहोत, पण लोकांनीही याविरोधात कोर्टात जायला हवं,’ असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे नव्या प्रभाग रचनेवरून ठाकरे विरूध्द ठाकरे असा नवा वाद निर्माण होणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रभाग रचनेवर कडाडून विरोध दर्शविला. ठाकरे म्हणाले की, आमदार, खासदार, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेलाही एकच उमेदवार असतो. पण महापालिकेला दोन-दोन, तीन-तीन सदस्यांचे प्रभाग. हा काय प्रकार आहे? ‘उद्या तीन आमदार किंवा खासदारांचा एक प्रभाग केला जाणार आहे या सगळ्या पद्धतीत नगरसेवक एकमेकांवर कुरघोड्या करत असतात. त्यामुळं कामं होत नाहीत. सत्ता काबीज करण्यासाठी हे सगळं केलं जातं. मागच्या दहा वर्षांपासून राज्यात हा खेळ सुरू आहे,’ असा आरोप राज यांनी केला.
लोकांना नगरसेवकांना भेटायचं असेल तर कुठल्या नगरसेवकाला भेटायचं? महापालिका निवडणुकीची संपूर्ण थट्टा करून ठेवली आहे,’ असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. मुळात देशात अशी कुठलीही पद्धत नाही. सर्व ठिकाणी एकच उमेदवार असतो. महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्याच्या हेतूनं हे सर्व सुरू झालं. या सगळ्याचा त्रास लोकांना होतो. लोकांनी तीन-तीन उमेदवारांना का मतदान करायचं? हे कायदेशीर नाही. योग्य नाही. निवडणूक आयोगानं यावर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्राचा आणि देशाचा कायदा वेगळा आहे का?,’ असा सवाल राज यांनी केला.
https://www.citizenjournalist4.com/multi-member-ward-structure-for-municipal-municipal-council-elections-10589/