मुंबई, दि. २८- गेल्या वर्षभरापासून मराठी पाट्या, टोलचा मुद्दा आदी प्रलंबित मागण्यात कागदावरच राहिल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, प्रलंबित प्रश्नासहित येत्या निवडणुका, धारावी पुनर्विकास प्रकल्प, अयोध्येतील राम मंदिर दौऱ्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. माजी आमदार बाळा नांदगावकर यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज आणि शिंदे यांच्यात गाठीभेटी वाढल्या आहेत. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत असल्याने राजकीय वर्तुळात उलट सुटल चर्चा रंगल्या आहेत. राज यांनी डिसेंबर महिन्यात दोनदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तर आतापर्यंत सहावी भेट झाली आहे. लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते.
या मुद्द्यांवर झाली चर्चा
मुंबईतील विविध विकासकामे, कल्याण डोंबिवलीचे प्रश्न, धारावी पुनर्विकास प्रकल्प, राम मंदिर निमंत्रण, टोलचा मुद्दा आणि सरसकट दुकानांवर मराठी पाट्या लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे यावेळी सांगण्यात आले.