मराठा पाटया, टोल नाके आणि कल्याण लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा …..
मुंबई राज्यातील दुकानांवरील मराठी पाट्या, टोल नाक्यांकडून सुरू असलेली लुटमार आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण – डोंबिवली मतदार संघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यात खलबत झाली. ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल दोन तास त्यांच्यात चर्चा झाली. आमदार राजू पाटील यावेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील दुकानांवर मराठी भाषेत व देवनागरी लिपीत पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयांच्या निर्णयानंतर महापालिकेने दुकानांना आदेश देत, मराठी पाट्या लावा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. परंतु अद्याप सरसकट मराठी पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. मनसेने त्यामुळे आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह राज्यातील अनेक ठिकाणी भागांतील दुकानांची तोडफोड केल्याचे समोर आले. दुसरीकडे टोलनाक्या विरोधात मनसेने भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दरम्यान, राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटवरून दिली.
कल्याण – डोंबिवली मतदार संघातील समस्यांचा पाढा
विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण – डोंबिवली मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा यावेळी करण्यात आल्याचे समजते. कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा, आदी अनेक समस्यांचा आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाढा वाचला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रातील पायाभूत सोयी सुविधा, ठाणे – गायमुख कोस्टल रोड. दिवा, पलावा, मानकोली व ठाकुर्ली येथील रखडलेले पुलाचे काम. कल्याण, डोंबिवली, दिवा रेल्वेस्टेशन परिसरातील १५० मिटर मधील अनधिकृत फेरीवाले, आगासनमधील खाजगी जमिनींवर टाकलेले आरक्षण, डायघरमधील कचरा प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण त्याला होणारा स्थानिकांचा विरोध, आदी मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीललवकरच मार्ग काढू, असे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.