नवी दिल्ली: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. येत्या दोन दिवसात महायुतीत मनसेचा समावेश होणार असल्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेचे इंजिन भाजपच्या रूळावरून धावणार आहे.
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले. त्यानंतर मंगळवारी भाजप आणि मनसेमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा पार पडली. दक्षिण मुंबईची जागा ही राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
शिवसेना फुटून दोन गट पडले तरी मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती कमी झाल्याचं दिसत नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँडच उपयोगी येईल असा कयास भाजपचा आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार आहेत. राज ठाकरेंच्या समावेशाने महायुतीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जातंय. राज ठाकरे यांचा करिश्मा लोकसभेच्या निवडणुकीत उपयोगी पडेल असा भाजपचा अंदाज आहे.
राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील यासाठी संमती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा सध्या भाजपकडे आहे, तर शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा : बाळा नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा तपशील अजून समोर आलेला नाही. मनसे लवकरच भाजपसोबत युती करुन महायुतीचा भाग होईल अशी शक्यता आहे. अशातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय येईल, असे सूचक वक्तव्य केलं आहे.