२९ ऑगस्टच्या तुलनेत अधिक पाऊस : बीएमसीने बजावली मोलाची भूमिका

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात २९ ऑगस्ट २०१७ रोजीच्या तुलनेत १९ सप्टेंबर २०१७ ला पावसाचे प्रमाण अधिक होते. पण या दोन्ही दिवशी महापालिका कर्मचा-यांनी अक्षरश: दिवस – रात्र एक करुन कामे केली आणि मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यात मोलाची भूमिका बजावलीची माहिती बीएमसीने आकडेवारीसह जाहीर केली आहे.

समुद्राने वेढलेल्या मुंबईत भरती आणि पाऊस यांची आकडेवारी नेहमीच महत्त्वाची ठरत आली आहे. २९ ऑगस्ट रोजी सर्वाधिक पाऊस हा सांताक्रूज परिसरात ३०३ मीमी इतका नोंदविण्यात आला होता. याच दिवशी २४ तासांमध्ये एकूण २३ ठिकाणी २०० मीमी पेक्षा अधिक; २६ ठिकाणी ५० मीमी पेक्षा अधिक; तर ५७ ठिकाणी ४० मीमी पेक्षा अधिक पाऊस पडला होता. याच दिवशी एका तासातील सर्वाधिक पाऊस भांडूप (एस वॉर्ड) मध्ये ९९ मीमी; तर त्याखालोखाल माटुंगा परिसरात (एफ उत्तर वॉर्ड) ९० मीमी पावसाची नोंद झाली होती. १९ सप्टेंबर रोजी अंधेरी परिसरात सर्वाधिक म्हणजे ३३४ मीमी पाऊस नोंदविण्यात आला. याच दिवशी २४ तासांमध्ये एकूण २४ ठिकाणी २०० मीमी पेक्षा अधिक; ४८ ठिकाणी ५० मीमी पेक्षा अधिक; तर २७ ठिकाणी ४० मीमी पेक्षा अधिक पाऊस पडला. काल एका तासातील सर्वाधिक पाऊस दहिसर मध्ये ९० मीमी; तर त्याखालोखाल बोरिवलीपरिसरात (प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह) ७४ मीमी पावसाची नोंद झाली. २९ ऑगस्ट व १९ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी पाणी साचले होते. या पाण्याचा त्वरेने निचरा होण्याच्या दृष्टीने पंप सुरु करण्यात येऊन पाण्याचा निचरा करण्यात आला होता. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी सरासरी कालावधी हा सुमारे २५ तास होता, तर १९ सप्टेंबर रोजी हाच कालावधी सरासरी ८ ते १० तास इतका होता.

समुद्राची पातळी वाढली

२९ ऑगस्ट रोजी पहाटे ४:५२ च्या भरतीच्या लाटांची उंची ३.२९ मीटर होती, तर सायंकाळी ४:४८ च्या भरतीची लाटांची उंची ही ३.२३ मीटर होती. १९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११:२५ वाजता भरतीच्या लाटांची उंची ४.५० मीटर होती, तर रात्री २३:४६ च्या भरतीची लाटांची उंची ही ४.२५ मीटर होती. २९ ऑगस्ट रोजीच्या अष्टमीची भरती असल्याने भरती ओहोटीमधील फरक हा ०.८५ मीटर होता. तर १९ सप्टेंबर रोजी हाच फरक ३.४ मीटर एवढा होता. २९ ऑगस्ट रोजीच्या अष्टमीची भरतीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढली असल्याने ‘फ्लड गेट’ (झडप) अधिक काळ बंद होते, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागला. पावसाचे पाणी समुद्रात जाण्याच्या अनुषंगाने हे ‘फ्लड गेट’ महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. मोठ्या भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी शहरात येऊ नये, यासाठी हे ‘फ्लड गेट’ बंद असतात.

वा-याचा वेगही अधिक

२९ ऑगस्ट रोजी वा-याचा सर्वाधिक वेग हा मरिन लाईन्स परिसरात ७०.८ किमी प्रति तास असा नोंदविण्यात आला होता. काल १९ सप्टेंबर वा-याचा सर्वाधिक वेग हा महापालिका मुख्यालयावरील स्वयंचलित हवामान केंद्रावर ५४.७ किमी प्रतितास एवढा नोंदविण्यात आला.

रेल्वे व बेस्टला कमी फटका 

२९ ऑगस्ट च्या पावसादरम्यान १५ ठिकाणी बेस्ट बसेसच्या मार्गांमध्ये बदल करावा लागला होता. तर मंगळवारी फक्त ७ ठिकाणी. २९ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या थांबलेल्या गाड्यांचा एकूण कालावधी हा मध्य रेल्वेच्या बाबतीत १९ तास, पश्चिम रेल्वेच्या बाबतीत ४.३५ तास; तर हार्बर रेल्वेच्या बाबतीत २१.५ तास होता. काल मध्य व हार्बर रेल्वेच्याबाबतीत १५ ते २० मिनीटांचा विलंब वगळता रेल्वे सेवा प्रभावित झाली नाही, अशी माहिती संबंधित रेल्वे अधिका-यांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!