मुंबई : आजची सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. १९ जुलैची रात्र इर्शाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असताना निसर्गाने जणू त्यांच्यावर घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटूंबे ढिगाऱ्याखाली गाढली गेली. हे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले. गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर गडावर चढून उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचावकार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले. मुख्यमंत्रयांनी तळ ठोकल्याने बचाव कार्याला वेग मिळाला आणि पून्हा एकदा मुख्यमंत्री एक सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसून आले.
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इरशाळगडाच्या पायथ्याला डोंगरात वसलेल्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर जवळपास ४८ कुटुंबे त्यातील २८८ व्यक्तींसह राहत होती. १९ जुलै २०२३ रोजीची रात्र ही यातील अनेकांसाठी काळरात्र ठरली. जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट असल्याने मागील २४ तासात संततधार पाऊस झाला. या धुँवाधार पावसामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी परस्थिती असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणा दिवसभर महाड, पोलादपूर, खेापोली सह विविध गावातील गुंतलेलीच होती. सायंकाळ नंतर पावसाचा जोर ओसले असे वाटत असताना प्रत्यक्षात अनेक भागात जोरदार पाऊस सुरूच होता. डोंगर दऱ्यातील आदिवासी पाड्यातील या वस्तीवर अचानक कोसळलेल्या आपत्तीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी धाव घेत तातडीने भेट दिली. याचा सकारात्मक परीणाम बचाव व मदत कार्यावर झाला.
विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत:ला बचावकार्यात झोकून दिले. राज्याचे मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इरशाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकूल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.
“मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो”, असे मुख्यमंत्री भाषणांमधून नेहमी सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो, आपत्ती येवो, वैद्यकीय मदत असो… सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ‘ऑन फिल्ड’ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली. मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी अथकपणे मदत आणि बचाव कार्याचे नेतृत्व केले.
प्रतिकूल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती, हे पाहून सकाळी साडेसातपासून ‘ऑनफिल्ड’ असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे, नागरिकांना बाहेर काढले पाहिजे, असे ते सोबतच्या मंत्र्यांनादेखील सांगत होते. इरशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सूचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इरशाळगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले…
केंद्रीय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसरातील सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय – काय करता येईल याची माहिती घेत होते. मदतकार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होताना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम केले, त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पीडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था, निवासाची सोय, भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.




