किल्ले रायगडावर शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची गर्दी ,
पण पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहाची गैरसोय..
महाड (निलेश पवार) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचे स्थळ किल्ले रायगडावर येणा-या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागलीय. पण पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांच्या गैरसोयीमुळे विद्यार्थी व पर्यटकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या समस्येकडे राज्य सरकारने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी हेात आहे.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सहलींचा आहे. या दरम्यान किल्ले रायगडवर शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. दिवसाला किमान तीस ते चाळीस मोठ्या बसेस किल्ले रायगड पाह्ण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि प्रसाधनगृहांची कोणतीच सोय नसल्याने मुली व महिलांची कुचंबना होत आहे. राज्य शासनाने किल्ले रायगडचा परिसर आणि गड विकासीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. त्यासाठी ६०० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेंत. प्राथमिक स्वरुपांत जरी कामे सुरु करण्यांत आली असले तरी प्रत्यक्षांत गडावर आणि गडाच्या परिसरांमध्ये कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न
रायगडावर जाण्यासाठी अनेकजण रोप वे चा तर अनेकजण पायी जाण्याचा पर्याय निवडतात. रायगडाच्या पायथ्याशी वाहन पाकिँगची सोय नसल्याने रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला वाहन उभी केली जातात. त्यामुळे अरूंद असलेल्या पायथ्याच्या मार्गावर वाहन कोंडी प्रश्न उद्भवला आहे. तसेच दैनंदिन एस.टी.च्या गाड्यांना या वाहन कोंडीतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. पर्यटक वाहने उभी करून जात असल्याने ती हलविता येत नाही तसेच स्थानिक पोलीसही वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी उभ नसतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.
धर्मशाळेची दुरवस्था
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली धर्मशाळा प्रशस्त आहे मात्र या धर्मशाळेची दुरावस्था झालेली पाहावयास मिळत आहे. महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडं दुर्लक्ष झालय देखरेखीसाठी एकही कर्मचारी उपलब्ध नाही. धर्मशाळेला प्रशस्त हॉल आणि सहा छोटे रूम आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छता नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृह देखील नादुरुस्त झाली आहेत तसेच पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने धर्मशाळेची दुरूस्ती करून ती नाममात्र भाडयाने दिल्यास शैक्षणिक सहलींना उपलब्ध करून दिल्यास त्यांचे बाहेर होणारे हाल थांबणार आहेत.
चित्तदरवाजा परिसरात दुर्गंधी
रायगड परिसरात पायथ्याशी आणि चित्तदरवाजा परिसरात पिण्याची पाण्याची तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नसल्याने शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना खाजगी हॉटेल मधील स्वच्छतागृहात पैसे मोजावे लागते. तसेच अनेक पर्यटक उघडयावरच जात असल्याने या परिसरात सर्वत्रच दुर्गंधी पसरलीय. त्यामुळे या समस्येकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.