डोंबिवली : मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत यांना हटवून नवीन शहर अध्यक्ष पदी राहुल कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज अचानक घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने शहरातील कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी आचंबित झाल्याचे दिसत आहे. या बाबतची कोणतीही पूर्व कल्पना नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या आधी सन २०१९ ला विधानसभेच्या तोंडावर घरत यांना हटवून त्यांना कल्याण ग्रामीण ची जबाबदारी देण्यात आली होती. या वेळी घरत यांना कोणतीही जबाबदारी दिल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र तडकाफडकी शहर अध्यक्ष बदलाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नेमके कारण काय?

या मागे मागील काही महिन्यांपूर्वी पासूनची पक्षाची अंतर्गत धुसफुस, गटबाजी असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे गटात गेलेले व मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे डोंबिवली शहरअध्यक्ष ओम लोके यांच्या नाराजीची पार्श्वभूमी असल्याची माहिती मिळत आहे. लोके यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, पक्षाचे नेतृत्व शहरात आले असताना पक्षाच्या प्रमुख पदावर असताना देखील केवळ स्वागतासाठी डावलने जाणे हे एक प्रकारे खच्चीकरण करण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले होते. यासारख्या अशा अनेक कारणांमुळे पक्षात आपली घुसमट होत होती, काम करण्याची संधी मिळत नव्हती त्यामुळे मनसेला राम राम ठोकत शिवसेना शिंदे गटात सामील झाल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान पक्ष सोडल्यानंतर त्यांना मुंबई येथे खुद्द पक्षअध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीचे निमंत्रण धाडले व तेथे शहरातील पक्षाच्या उणीवांचा पाढाच बोलून दाखवल्याने त्याची परिणीती शहराध्यक्ष नेमणुकीतून दिसून येत असल्याची माहिती मिळत आहे.

पक्षाकडून याबाबतीत अधिकृतरीत्या अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मनोज घरत हे पक्ष स्थापनेपासूनचे कार्यकर्ते असून २०१० ते २०१५ या कार्यकाळात ते पक्षाचे नगरसेवक म्हणून पालिकेत कार्यरत होते. २०१५ नंतर पक्षाच्या कमजोर काळात त्यांनी पक्षाची जबाबदारी पेलली ही त्यांची जमेची बाजू ठरली. परंतु गेल्या काही महिन्यांत शहरात पक्ष आहे की नाही अशी स्थिती असताना पदाधिकारी कमालीचे नाराज होते. आजच्या निवडीनंतर राहुल कामत हे शहरातील पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. कामत हे राज ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून लोकसभेच्या दृष्टीने त्यांच्याकडे वेळ कमी असल्याने पक्षाचे इंजिन पूर्वपदावर आणणे हे जोखमीचे काम त्यांच्यावर येऊन ठेपले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!