डोंबिवली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या कल्याण जिल्ह्याच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी,संजय आदक, नगरसेविका पाटील,संतोष शिंदे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केला असून याविरोधात राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

 शशिकांत कांबळे  यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना  ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.  राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते.  न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व  संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी  न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.

सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते , असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.  मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत , इंजिनीअर आहेत , व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे  हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही शशिकांत कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!