ठाणे : राबोडी विभागातील खत्री अपार्टमेंटच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने या दुर्घटनेत दोन रहिवाशांचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. सदर इमारत धोकादायक असल्याने त्वरीत रिकामी करण्यात यावी अशा सुचना पालिकेने दिले होते. मात्र त्याकडे कानाडोळा करून रहिवाशी राहत होते. अखेर पालिकेने इमारत पुर्णपणे खाली करुन सील करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात ४५२२ इमारती धोकादायक असून यातील ७३ इमारती अत्यंत धोकादायक आहेत त्यामुळे धोकादायक इमारतीतील लाखेा रहिवाशांचा जीव टांगणीला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील राबोडी येथील खत्री अपार्टमेंट या इमारतीच्या सी-विंग च्या तिसऱ्या मजल्याचे फ्लोरिंग, दुसऱ्या व पहिल्या मजल्याचे स्लॅब कोसळून आज पहाटे सहाच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेमध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठा आवाज झाल्यानंतर रहिवाशी घराबाहेर आले त्यांनी ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी ७५ जणांना तात्पुरत्या स्वरुपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या इमारतीच्या एकूण तीन विंग असून त्या तिन्ही विंग धोकादायक आहेत.
महापालिकेने २०१३ साली खत्री इमारत धोकादायक इमारत म्हणून घोषित करुन महाराष्ट्र महापालिका अधिनियमचे कलम २६४ (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावण्यात आली होती. सदर नोटिसच्या विहित मुदतीनंतरही भोगवटधारकांनी इमारत रिक्त न केल्याने कलम २६८ (सी-१) अन्वये संबंधितांना नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी इमारत रिक्त न केल्याने महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६८(५) अन्वये राबोडी पोलिस स्थानक यांना इमारत रिक्त करून देणेबाबत पालिकेकडून पत्र देण्यात आले होते, त्यानंतर या इमारतीच्या भोगवटधारकांना आजतागायत तीन वेळा इमारतीच्या दुरुस्तीबाबत स्मरणपत्र देण्यात आली होती. त्यामध्ये इमारत तातडीने रिक्त करून दुरुस्त करावी तसे न केल्यास काही जीवित व वित्त हानी झाल्यास झालेल्या दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही,असेही पालिकेकडून नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान, इमारतीची काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे ८५ टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, उरलेले १५ टक्के काम तातडीने दुरुस्त करा, तसे न केल्यास काही दुर्घटना घडल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार नाही असेही पत्र मे. सेंटरटेक यांनी संबंधितांना दिलेले होते. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. सदरची इमारत पुर्ण रिकामी करुन काम करण्यात आले नसल्याने आज दुर्दैवाने दुर्घटना घडली आहे असे पालिकेकडून सांगण्यात आले.
४५२२ इमारती धोकादायक
ठाण्यात ४ हजार ५२२ पैकी ७३ इमारती धोकादायक असून येथील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक म्हणजेच ४३ धोकादायक इमारती आहेत. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदरमध्ये केवळ एक इमारत धोकादायक आहे, तर वर्तकनगर भागात एकही इमारत धोकादायक नाही. सर्वात दाटीवाटीचा परिसर आणि अनधिकृत इमारती असलेल्या लोकमान्य-सावरकरमध्ये ७ , उथळसरमध्ये ६, कळव्यामध्ये ५ , मुंब्य्रामध्ये ६ आणि दिव्यामध्ये ५ इमारती अतिधोकादायक आहेत. मुंब्रा, वागळे इस्टेट आणि दिवा भागांत धोकादायक इमारतींची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी कळवा परिसर अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये सर्वात आघाडीवर होता. मात्र यंदा त्या ठिकाणी एकही धोकादायक इमारत नसल्याचे यादीतून दिसून येते.