मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरतला जात असलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांच्या गाड्या अडवून चौकशी होत असतानाच आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचीही गाडी गुजरात पोलिसांनी अडवली.
यावेळी गुजरात पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात बाचाबाची झाली. गुजरातमध्ये जाणाऱ्या दारुची देखील अशीच चौकशी केली जाते का? असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारला. तसेच एकनाथ शिंदेसोबत जेव्हा आमदार मुंबईतून सुरतला गेले होते, तेव्हा त्यांची चौकशी केली होती का ? त्यांना अडवलं होतं का ? असा संतप्त सवाल ठाकूर यांनी विचारला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी सूरत कोर्टात झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी येणार होते. यासाठी देशभरातून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुरतकडे रवाना झाले होते. महाराष्ट्रातूनही अनेक नेते गुजरातकडे निघाले होते. या नेत्यांच्या गाड्या गुजरात राज्याच्या सीमेवर अडवून त्यांची चौकशी करण्यात आली.
यावेळी पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकचक झाली. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी केली होती का? असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलिसांना केला.
यावेळी ठाकूर म्हणाल्या की, गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर आमच्या गाडीला दोन ठिकाणी थांबवण्यात आलं. माझं आयकार्ड तपासण्यात आलं. सत्तांतराच्या वेळेस शिंदे गटाच्या आमदारांना रेड कार्पेट टाकून संरक्षण देणारे हेच ते गुजरात चे पोलीस आहेत, जे आज राहुलजींच्या समर्थनार्थ गुजरातला जाणाऱ्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांची चौकशी करतायत. मी अशा पोलीसी कारवायांना घाबरत नाही. अशा पोलीसी कारवायांचा मी निषेध करते.
तुम्हाला मला अटक करायची असेल तर करा मी घाबरत नाही. गप्प बसणार नाही. आमचं संभाषण थेट गांधीनगर ला लाइव्ह चाललंय असं सांगण्यात आलं. तुम्ही गांधी नगर ला लाइव्ह करा नाही तर पंतप्रधान कार्यालयाला. तुम्ही मला रोखू शकणार नाही अशा शब्दात ठाकूर यांनी पोलिसांना सुनावले.