कल्याण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण शाखा अभियंता अविनाश भानुशाली याना एक लाखाची लाच स्वीकारताना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केल्याची घटना आज घडली. भानुशाली यांनी ४ लाख रुपये घेतले असतानाच आणखी १ लाखाची मागणी केली होती असे तक्रारदार यांनी सांगितले. विशेष म्हणजे भानुशाली हे सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते.
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गच्या भुसंपादनाचे काम सुरू आहे हा मार्ग कल्याण नजीकच्या रायते गावातून जात असल्याने यामध्ये तक्रादाराचे बांधकाम बाधित होत आहे. सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी भानुशाली याने ९ सप्टेंबर रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख घेतले त्यानंतर 1 लाख रकमेच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार केली. सदर तक्रारीनुसार ठाणे एसीबी युनिटने आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सापळा रचून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे
लाचखोरी फोफावतेय ….
गेल्या १५ दिवसात कल्याण तहसीलदार दिलीप आकडे त्यांचा शिपाई बाबू कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज शिपाई डावरे याना नव्या नळ जोडणीसाठी 4 हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आज शाखा अभियंत्याला अटक झाल्याने कल्याण डोंबिवलीत लाचखोरी फोफावत असल्याचे दिसून येत आहे.