50 तासानंतर ओमची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका
पुणे : ६० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या सात वर्षीय ओम खरात याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तब्बल ५० तासानंतर ओमची सुटका झाली आहे. ओमची सुखरूप सुटका झाल्याने त्याच्या कुटूंबियांच्या आणि पोलिसांच्या चेह-यावर आनंद पसरला.
पूर्णानगर येथील साईनिवास हौसिंग सोसायटीजवळ राहणाऱ्या ओमचे शनिवारी अपहरण करण्यात आले होते. ओमचे वडील हे व्यावसायिक असल्याने अपहरणकर्त्यांकडून त्याच्या वडीलांना तीन फोन कॉल करण्यात आले होते. अपहरणकत्यांनी त्यांच्याकडे 60 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ओमच्या तपासासाठी पोलिसांनी सावधानतेने पावले उचलली होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 400 पोलिस या शोध मोहिमेत सहभागी झाले होते. मोबाईल लोकेशनवरुन पोलिस शोध घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी ओमची सुटका करुन, तिथून पळ काढला. ओमला कोणतीही इजा करण्यात आलेली नाही. अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.