मुंबई, दि. ११: पुणे येथील ’हिट अॅण्ड रन’ प्रकरणात पोलीसांनी दाखवलेल्या हुशारीमुळे सर्व पुरावे प्राप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणात कोणालाही क्लिनचीट द्यायची नाही, असे सांगत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे फडणवीस स्पष्ट केले.
पुणे येथे पोर्शे या आलिशान गाडीच्या धडकेत दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. गाडी चालवणारा आरोपी हा अल्पवयीन असून त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामुळे गृहविभाग, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण विभागात अनागोंदी समोर आल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी परिषदेत लक्षवेधीद्वारे केली. या लक्षवेधीच्या चर्चेत विक्रम काळे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत, अपघाताचा घटनाक्रम वाचून दाखवला. दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी मुलगा अल्पवयीन म्हणून नव्हे तर सज्ञान समजून कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. पोलीसांनी त्या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने खालच्या न्यायालयात पुर्नयाचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पुर्नयाचिका दाखल केल्यानंतर शिक्षा बदलण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारांने रक्ताचा डीएनए बदलला होता. पोलीसांनी डॉ. हल्लूर व डॉ. तावरे यांचे व्हॉटस् अॅप ट्रॅक करून मध्यस्थांना अटक केली. दरम्यान डॉक्टरांनी ३ लाख घेऊन रक्ताचे नमुने बदल्याचा वास्तव समोर आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुण्यातील घटनेनंतर अनधिकृत पब आणि बारवर कारवाई केली जात आहे. इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. बार आणि पब वेळेवर बंद झाले नाही तर कारवाई होणार, असा इशारा दिला. जवळपास ६० पब आणि बार बंद केले असून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा होणारा गैरफायदा पाहता यापुढे असे फुटेज केवळ पोलिसांनाच मिळणार असे त्यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्हीमधून पबमध्ये अल्पवयीन मुलांना सोडले आहे का हे सुद्धा तपासले जाईल. तीन महिन्यापर्यंत फुटेज ठेवणे पब मालकांना बंधणकारक असणार आहे. हे फुटेज पोलीस कधीही पाहू शकतात. तसेच पोलीसांव्यतिरिक्त इतर कोणालाही फुटेज दिल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.