मुंबई : शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथसाहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रंथाच्या प्रकाशनावेळी सांगितले.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उद्योगमंत्री सुभाष देसाई राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम खासदार अरविंद सावंत महापौर किशोरी पेडणेकर आमदार मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथाचे प्रकाशन हे माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
ठाकरे पुढे म्हणाले की, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते. पूर्वीच्या काळातील वाईट चालीरितींविरोधात ते ठामपणे उभे राहिले. प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशातील सर्व राज्यांत पोहोचण्यासाठी त्याचे भाषांतर करण्याचे आवाहन केले. प्रबोधनकार कसे कडक शिस्तीचे होते ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. पण मी नातू असल्याने माझ्या वाट्याला सुदैवाने ते आले नाही. त्यावेळी आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या.
आपण माणूस म्हणून पहिल्यांदा जन्माला येतो. देश हाच धर्म आहे पण कुणी समोरून स्वतःचा धर्म घेऊन वाईट विचाराने आला तर मी एक कडवट हिंदू आहे हे लक्षात घ्यावे. लोकशाहीत मत महत्वाचे आहे पण हिंमत सुद्धा लागते. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतीचा विरोधात त्या काळी प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. माझे आजोबा नास्तिक नव्हते पण ढोंग त्यांना आवडत नव्हते, ते सरळ लाथच मारायचे. आमचं शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही. प्रबोधनकारांचे ग्रंथ साहित्य देशात सर्व राज्यात पोहचवावे त्यासाठी त्याचे भाषांतर झाले पाहिजे असेही आवाहन ठाकरे यांनी केले.
नवहिंदू प्रकार फार घातक आहे. हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीसारखे होते आहे. शंभर वर्ष झाल्यानंतर सुद्धा माझ्या हस्ते प्रकाशन होते आहे हे माझ्यासाठी समाधान देणारे , भाग्याचे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील फटकारे पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती असेही ठाकरे म्हणाले,