डोंबिवली दि.3 नोव्हेंबर : बाहेरून येणाऱ्या मच्छी विक्रेत्यांविरोधात डोंबिवली पश्चिमेतील स्थानिक महिला मासे विक्रेत्या आक्रमक झाल्या असून आज या मच्छी विक्रेत्यांनी बंद पाळत आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामूळे माशांवर ताव मारण्याचा बेत आखणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात भरणारा किरकोळ मासळी बाजार हा उभ्या डोंबिवलीत प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी स्थानिक भूमीपुत्र समाज बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वसई आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक मासे विक्रेते डोंबिवलीमध्ये येऊन व्यवसाय करत असल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्या महिलांनी दिली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डोंबिवलीतील भूमीपुत्र महिलांना सहकार्य करण्याऐवजी वसईहून येणाऱ्या मासे विक्रेत्यांना सहकार्य करत असल्याबद्दलही डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिला मासे विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
दरम्यान आज शुक्रवार असून मांसाहारी खवय्यांचा आवडीचा दिवस. त्यामुळे सकाळच्या सुमारास मासे घेण्यासाठी अनेकांनी लगबगीने मासळी बाजार गाठला. पण तिकडे मच्छी विक्रेत्या महिलांनी आज मासे विक्री बंद ठेवल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला.