ठाणे दि. ११ : नांदेड जिल्हातील बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना बुधवारी उपसभापती शंकर आधव यंकम यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राजपत्रित अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आज दिवसभर कामकाज केले. तसेच राजपत्रित अधिकारी संघटनेने उपसभापती यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांना निवेदन दिले.
यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन विभाग ) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) चंद्रकांत पवार, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) शेषराव बडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हणमंतराव दोडके उपस्थित होते. नांदेडमध्ये घडलेल्या या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून उपसभापती यांना तात्काळ अटक करून त्यांचे उपसभापती पद व पंचायत समिती सदस्य पद रद्द करावे व नाईक यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.