मुंबई : आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत सखोल चौकशी करण्यासाठी शिवसेने ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, गुरूवार ७ डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून त्या पूर्वसंध्येलाच राऊत यांनी पत्र लिहिल्याने अधिवेशनात आरोग्य मंत्रालयाच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाचा गाजण्याची शक्यता आहे.
राज्यातील जनतेच्या जीवनमरणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विभाग असलेला आरोग्य मंत्रालय विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हा विभाग भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सखोल चौकशी करून संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांचे पोस्टमार्टेम करावे, अशी मागणी राऊत यांनी केली असून, या भ्रष्टाचार व अनियमततेची प्रकरणे पुराव्यासहित माझ्याकडे असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसां इतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. ही प्रकरणे पुराव्यासह आली असून हा सगळाच प्रकार गंभीर आहे. राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा प्रकार सुरू आहे. नियमबाह्य बढत्या व बदल्या हा एक मोठा उद्योग आरोग्य विभागात बनला असून या उद्योगाचे ‘संचालक’ संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
५० कोटीच्या वसुलीसाठी खास ओएसडीची नियुक्ती..
महाराष्ट्रातील एकूण १२०० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ‘समावेशन’ करण्यासाठी प्रत्येकी ४ लाख असे एकूण साधारण ५० कोटी रुपये जमा केले. ते पैसे संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास ओएसडीची नियुक्ती केली. महात्मा ज्योतीराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड १ लाख रुपये घेतले जातात. बोगस लाभार्थीची भरमसाठ खोटी बिले, खोटे रुग्णांवर कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जातात. आरोग्य खात्यातील दोन्ही संचालकपदे रिक्त, २४ पैकी १२ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जन नियुक्तीपदी नियुक्त्या करण्यात आल्याचे राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.