कल्याण : कैद्याने वकिलाला धमकी दिल्याचा प्रकार अनेकवेळा आपण सिनेमात पाहिला असेल, पण असाच काहीसा प्रकार कल्याण न्यायालयात प्रत्यक्षात घडलाय. हत्येच्या गुन्ह्यात आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आकाश तावडे या कैद्याला सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात आणले होते. न्यायालयातील सुनावणीनंतर संतापलेल्या कैदी आकाशने वकिलाला मारहाण केली, पण हा कैदी इथेच थांबला नाही तर त्याने हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी है , तुला खल्लास करेन , मी वाघाचा बच्चा आहे ….अशी फिल्मी स्टाईल धमकी दिली .या प्रकरणी सरकारी वकिलाने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
कल्याण तालुक्यातील म्हारळ येथे राहणारा आकाश तावडे हा हत्येच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षापासून आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गुन्ह्याच्या अंतिम सुनावणीसाठी बुधवारी त्याला कारागृह पोलिसांनी न्यायालयात आणले होते. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ॲड. योगेंद्र पाटील म्हणून काम पाहत आहेत. न्यायालयात न्यायाधीशासमोर आकाश तावडे वर पोलिसांनी दाखल आरोप पत्रावर सुनावणी सुरू केली. न्यायालयाने आकाश ला उद्देशून या गुन्ह्यात तुम्हाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा असल्याचे सांगितले .याच दरम्यान संतापलेला कैदी तावडे कठड्यातून बाहेर आला. आणि त्याने सरकारी अभियोक्ता योगेंद्र पाटील जीव ठार मारण्याची धमकी दिली. न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी यांच्या समोर हा प्रकार घडल्याने सरकारी कामात अडथळा, धमकी दिल्याप्रकरणी सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.