नाशिक : कोरोना तसेच लॉकडाऊनमुळे अनेकांना नोक-या गमवाव्या लागल्या आहेत तर अनेकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. हाताला काम नसल्याने काही तरूणंनी थेट नोटांचा छापखाना सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिक पोलिसांनी हा छापखाना उध्दवस्त केला असून सात जणांना अटक केलीय.
नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील तालुक्यात हा छापखाना सुरू करण्यात आला होता. कलर प्रिंटरचा व्यवसाय बंद झाल्याने हाताला काम नसल्याने काही तरूणांनी बनावट नोटा छापण्याचं धाडस केल. गेल्या तीन महिन्यापासून बनावट नोटा छापण्याचे काम सुरू होते अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पावणेसात लाखाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या तब्बल ६ लाख ७५ हजारांच्या बनावट नोटांसह नोटा छपाईचे प्रिंटर, कागद आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. सुरगाण्याच्या भाजीबाजारात टोळीकडून १०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याच्या प्रयत्नात असतानाच एका भाजी विक्रेत्या महिलेला संशय आल्याने बनावट नोटांचा पर्दाफाश झाला.