ठाणे, दि. १० (प्रतिनिधी) : गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ३ कोटी १० लाख पक्की घरे देशभर बांधण्यात आली आहेत. या योजनेसाठी ३ लाख कोटींहून अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज पत्रकान्वये दिली. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात ६ लाख ६८ हजार ३६३ बांधून देण्यात आली आहेत, असे पत्रकात नमूद केले आहे.
भाजपाच्या ४२ व्या स्थापनादिनानिमित्त नरेंद्र मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आमदार डावखरे यांनी ही माहिती दिली. देशातील प्रत्येक गरीब माणसाच्या मालकीचे घर असावे, या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी शहरी व ग्रामीण भागात होत आहे. ग्रामीण भागात २ कोटी ५२ लाख घरे बांधली आहेत. तर शहरी आवास योजनेअंतर्गत ५८ लाख पक्की घरे बांधली आहेत. ग्रामीण आवास योजनेअंतर्गत १.९५ लाख कोटींचे, तर शहरी आवास योजनेअंतर्गत १. १८ लाख कोटी इतके अर्थसहाय्य लाभार्थींना देण्यात आले आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
गरीब माणसाला हक्काचे घर असले की त्याच्या जीवनाला स्थैर्य मिळून तो आपल्या उत्पन्नवाढीसाठी अधिक जोमाने नवे प्रयत्न करू शकतो, हे ओळखून या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेखाली बांधून देण्यात येणाऱ्या घरात उज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मोफत दिले जाते. तसेच शौचालय, पाणी पुरवठा, वीज कनेक्शन या सुविधाही दिल्या जात आहेत, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.