मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. मुंबईत पुढील ७२ तासांत सलग मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर तुरळक पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरु होणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आल्यानंतर मान्सून  गायब झाला होता. १० जून उलटूनही पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

पावसाच्या आगमनामुळे मुंबईकर पुन्हा खूश असल्याचे पाहायला मिळत आहे.   कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसरसह मुंबई उपनगरात आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबईत आतापर्यंत फक्त रिमझिम पाऊस झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा जाणवू लागला आहे. मुंबईत उष्णतेमुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईप्रमाणे ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा येथे आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. कळवा मुंब्रा येथे सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे परिसरातील वातावरण थंड झाले आहे. तसेच नवी मुंबईत सुध्दा सकाळी जुईनगर आणि नेरुळ भागात रिमझिम पाऊस झाला.

२७ तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी

कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यात उद्यापासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिन्ही जिल्ह्यात घाट परिसर असल्यामुळे अधिक पावसाची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस तिथं ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 27 तारखेपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून जारी करण्यात आली आहे. कालपासून नागपूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पुणे शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वातावरणात गारवा पसरला.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!