मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवा अशा सुचना जिल्हा प्रमुखांना दिल्या. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसने ऐतिहासीक विजय संपादन करीत भाजपचा पराभव केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी सज्ज राहा अशा सुचना ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि नेत्यांना केल्या.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकालाची तांत्रिक माहिती जिल्हाप्रमुखांना देण्यात आली. कारण निकाल विरोधात लागला असताना पेढे वाटत आहेत. हा निकाल ग्रामीण पातळी शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिंदे गट आणि भाजप संभ्रम निर्माण करत आहे. हे लोकांना समजावून सांगा. सुप्रीम कोर्टाच्या निकालातील आपल्या बाजूचे सकारात्मक मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवा. प्रतोद म्हणून भरत गोगावले आणि गटनेते म्हणून शिंदेंना कोर्टानं बेकायदेशीर ठरवलं, जनतेला पटवून द्या. अजय चौधरी गटनेते आणि सुनील प्रभू शिवसनेचे प्रतोद, कोर्टानं शिक्कामोर्तब केलं केलं आहे. जनतेपर्यंत पोहचवा. निवडणूक आयोगानं विधीमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय घेऊ नये, कोर्टानं हे स्पष्ट केले असे दानवे सांगितले.

तसेच यंदाही १८ जूनचा शिवसेनेचा वर्धापनदीन जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तालुका, जिल्हा पातळीवरील शिवसैनिक येतील’, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या आजच्या बैठकीत सर्व जिल्हाप्रमुखांना, संपर्कप्रमुखांना सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आदेश दिला. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *