त्यांच्यासाठी तो देवमाणूसच ठरला …
डोंबिवली : पतीचे छत्र हरपले, त्यानंतर सहा मुलींच्या पालन पोषणाची जबाबदारी अंगावर पडली, घरची धुणी भांडी करून त्या माऊलीने पाच मुलींना संसाराला लावले. शेवटच्या मुलीच्या लग्नाचे टेन्शन तिला सतावत होते. एकही पैसा हातात नव्हता. साखरपुडा कसा काय होणार, अशा विवंचनेत असतानाच त्या माऊलीच्या मदतीला एक देवमाणूसच धावून आला. त्या देवमाणसाचे नाव आहे प्रल्हाद म्हात्रे. गोरगरीबांच्या मदतीना नेहमीच धावून जाणारे प्रल्हाद म्हात्रे यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुडयाची जबाबदारी घेतली आणि रविवारी मोठया थाटामाटात साखरपुडा पार पडला. आणि लग्नाची जबाबदारीही त्यांनी उचलली. प्रल्हाद म्हात्रे हे त्यांच्यासाठी देवमाणूसच ठरलेत.
डोंबिवली पश्चिमेतील बाबाजी म्हात्रे चाळ, खोली क्र.२, चिंचोड्याचा पाडा सविता शांताराम ठाकरे या राहतात. त्यांचे पती शांताराम वामन ठाकरे यांचे सन २०१० मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर सविता ठाकरे यांनी धुणी भांडयाची कामे करीत मोठ्या हिंमतीने त्यांच्या पदरी असलेल्या ६ मुलींचे पालनपोषण केले. त्यातील पाच मुलींची लग्न आपल्यापरीने केली. ८ एप्रिल रोजी शेवटच्या मुलीच्या साखरपुडयाची तारीख ठरली. पाच मुलींची लग्न करताना मेटाकुटीस आलेल्या सविता यांच्याकडे काहीच पैसे नसल्याने त्या आर्थिक विवंचनेत सापडल्या होत्या. त्यांच्याच एका नातेवाईकांकडून प्रल्हाद म्हात्रे यांना हे समजलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता. प्रल्हाद म्हात्रे हे त्यांचे मित्र अॅड प्रदीप बावस्कर यांना घेऊन ठाकरे यांच्या घरी पोहचले. मनीच्या साखरपुडयाचा खर्चाची जबाबदारी त्यांनी उचलली. त्यानुसार ८ एप्रिल २०१८ रोजी प्रल्हाद म्हात्रे यांच्या उपस्थितीत मनीषा हीचा साखरपुडा चि. प्रमोद चौधरी. राहणार खाणीवरे,मुरबाड यांच्याशी मोठ्या आनंदात पार पडला. आणि लग्नाचीही जबाबदारी स्वीकारली. आतापर्यंत प्रल्हाद म्हात्रे यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिलाय. प्रल्हाद म्हात्रे हे मनसे शहर संघटक आणि परिवहन समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दुर्घटनाग्रस्त इमारतीतील कुटुंबाला दत्तक घेणे असो, लहान बाळाच्या हृदय शस्त्रक्रियेचा खर्च, खेळाडूंचे पालकत्व स्वीकाणे, वाहक-चालकांना परिवहनचं ‘मानधन’ देणं, भावना पटेल नावाच्या मुलीच्या लग्नाचा संपूर्ण खर्च असो अथवा नाम फाउंडेशनला देणगी देणे असो अशी अनेक प्रकारची समाजकार्य त्यांच्या हातून झालेली असून त्यांनी एक समाजात आगळावेगळा आदर्श उभा केलाय.