डोंबिवली (प्रतिनिधी) :शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षांचे औचित्य साधून स्वरतिर्थ सुधीर फडके स्मृती समितीच्या वतीने “प्रभो शिवाजी राजा” या सांगीतिक मैफलीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे ७०० ते ८०० रसिक डोंबिवलीकरांच्या उस्फुर्त प्रतिसादात ही मैफल पार पडली. या निमित्ताने शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर उलगडण्यात आला.
ए.के.एस क्रिएशन्सच्यावतीने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. या कार्यक्रमाची संकल्पना अभिजीत जोशी यांची होती. समितीची संकल्पना, त्याभोवती अभिजीत जोशी यांनी केलेली सुंदर गीत-गुंफण, शिवरायमहिमा आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीनं सादर करणारं अनघा मोडकचं निवेदन, स्वरा जोशी, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी आणि धनश्री देशपांडे यांचा सुरेल सुस्वर यामुळे कार्यक्रम उत्तम रंगला.
यावर कळसाध्याय चढवला तो समिती कार्यवाह आणि लोककला अभ्यासक विवेक ताम्हनकर दिग्दर्शित शिवराज्याभिषेक सोहळ्यानं.. राजांची राज्याभिषेक सोहळ्यासाठीची मिरवणूक भर सभागृहाच्या पार्श्वदारातील दरवाजातून सभागृहात आणि मग मंचावर प्रवेशती झाली आणि सभागृहानं उभं राहून महाराजांना मानवंदना दिली. सुमारे चाळीस कलाकारांनी सादर केलेला हा नेत्रदिपक सोहळा रसिक डोंबिवलीकरांच्या कायम स्मरणात राहिल.