वसई : वसईतील अमाफ़ ग्लास टफ़ कंपनीने गेल्या ५० महिन्यात तब्बल ६ कोटी 17 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाच्या धाडीत उघडकीस आला आहे. वीज मीटरवरील वीज वापराची नोंद रिमोटच्या साह्याने ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनास आले असून कारखान्याचे दोन भागीदार, जागामालक आणि वीजचोरीची यंत्रणा उभारून देणारा एकजण अशा चौघा जणांविरूद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यालयाकडून ग्राहकाच्या वीज वापर विश्लेषणातुन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग तसेच मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वसईच्या कामन गाव परिसरातील अमाफ ग्लास टफ (गाळा क्रमांक एक, प्लॉट क्रमांक 3 व 4, युनिक इस्टेट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, आयेशा कंपाउंडजवळ, सर्वे क्रमांक 155) कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिर हुजेफा, जागेचे मालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारा अज्ञात व्यक्ती अशा चार जणांचा समावेश आहे. भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार 674.76 किलोवॉट आढळला. तपासणी दरम्यान हकीमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रिमोट कंट्रोल आढळून आला. या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीजवापरात 90 टक्के घट होत असल्याचे पंचासमक्ष केलेल्या प्रात्यक्षिकात आढळून आले. तर रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्विच बोर्डमध्ये निळ्या, काळ्या व लाल टेपमध्ये लपवलेले निदर्शनास आले. मीटरच्या बाहेरील बाजूस रिमोट कंट्रोल सर्किट बसवून व फ़ेरफ़ार करुन वीज वापरणे ही वीजचोरी ठरते याबाबत कल्पना दिल्यानंतर वीज वापरकर्त्यांनी वीजचोरी केल्याचे मान्य केले.
जूलै २०१७ पासून या कारखान्याने ६ कोटी १७ लाख ७१ हजार ३३० रुपये किंमतीची ३३ लाख ६ हजार ४९५ युनिट विजेची चोरी केल्याबाबत वाशी भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सुर्यकांत पानतावणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात वीज कायदा 2003 च्या कलम 135, 138 व 150 नुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारखाना वलीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी वलीव पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.