तीन लाख ग्राहकांकडे १९१ कोटीची थकबाकी

कल्याण : वारंवार सूचना करूनही विहित वेळेत चालू वीज देयकासह थकित वीज देयक भरणा न करणाऱ्या कल्याण परिमंडळातील नऊ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणच्या विशेष पथकांनी खंडित केला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून वीज तोड मोहीम सुरू करण्यात आली आहे.


कल्याण परिमंडलातील तीन लाख २० हजार ३०१ वीज ग्राहकांकडे वीज देयकाची १९१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण, डोंबिवली विभागात ५० हजार ग्राहकांकडे २८ कोटीची थकबाकी आहे. या विभागात एक हजार १९१ ग्राहकांची वीज पुरवठा खंडित केला आहे. उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, २७ गाव ग्रामीण भागात ९६ हजार ९४८ ग्राहकांकडे ६८ कोटीची थकबाकी आहे. या विभागात तीन हजार ६३३ ग्राहकांची वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. ग्राहकांना वीज देयक भरणा सुरळीत व्हावा म्हणून सुट्टीच्या दिवशी महावितरणनने वीज देयक भरणा केंद्रे सुरू ठेवली आहेत.
वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्राहकांनी थकबाकी, नियमानुसार वस्तू आणि सेवा करासह पुनर्जोडणी शुल्क भरल्या शिवाय ग्राहकांची वीज पुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. वीज पुरवठा तोडलेल्या ग्राहकांनी चोरून वीज घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर विद्युत कायद्याने फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *