डोंबिवलीत २१० ग्राहकांनी घेतला लाभ !
डोंबिवली : महावितरणच्या डोंबिवली विभागात गेल्या दोन महिन्यात २१० जणांना २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. ‘पॉवर ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांसह आवश्यक साहित्याचे वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे. नवीन वीज जोडणीसाठी कॉल किंवा संदेश आल्यानंतर कर्मचारी वाहनासह नवीन ग्राहकापर्यंत पोहचतात व सर्व प्रक्रिया पूर्ण करून तत्काळ नवीन कनेक्शन देत आहेत.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागात ‘पॉवर ऑन व्हिल्स्’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत डोंबिवली विभागासाठी ८८७९६२६९०९ हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तसेच एक अभियंता, दोन तांत्रिक कर्मचारी, नवीन वीजजोडणीचे साहित्य आणि मीटरसह एक वाहन या उपक्रमासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटस ॲप संदेश आल्यानंतर वाहनासह कर्मचारी संबंधितांपर्यंत पोहचतात व ए-वन अर्ज भरून घेतात. त्यानंतर कोटेशन देण्यात येते व ग्राहकाकडून कोटेशनचा ऑनलाईन भरणा करून घेतल्यानंतर तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात येते. ही सर्व प्रक्रिया ग्राहकापर्यंत पोहचून जागेवरच पूर्ण करण्यात येते.‘पॉवर ऑन व्हिल्स’ उपक्रमातून तत्काळ नवीन वीजजोडणी मिळत असल्याबद्दल डोंबिवलीतील नवीन ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दोन महिनाभरात डोंबिवली विभागात १६१९ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या असून त्यातील २१० वीजजोडण्या अवघ्या २४ तासांच्या आत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल वनमोरे व त्यांच्या टिमकडून हा उपक्रम सुरळीतपणे सुरू असून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.