मुंबई : हाजीअली जवळील वत्सलाबाई देसाई चौकानजीक असणा-या केशवराव खाड्ये मार्गालगत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज २ हजार किलो कच-याचा (Organic Waste) वापर करुन वीज निर्मिती केली जाणार आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज २ हजार किलो कच-यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३०० इतके युनिट वीज निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या वीजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चात देखील बचत करणे शक्य होणार आहे.

‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन …..
मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये एक महत्त्वाचे आकर्षण असणा-या आणि राणीचा रत्नहार अशी ओळख असणा-या मरिन ड्राईव्ह अर्थात नेताजी सुभाष मार्गालगत लवकरच एक नवे पर्यटन स्थळ आकारास येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग क्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे वैशिष्ट्यपूर्ण व मनमोहक दर्शन घडविणा-या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजनही ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, संबंधीत उच्चस्तरीय समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *