ठाणे (प्रतिनिधी) : एकिकडे राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत, तर दुसरीकडे ठाण्यात शिवसेना सत्तेत असून राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मंगळवारच्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनानंतर महापौरांनी आम्हाला स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादीची गरज नसल्याचे वक्तव्य केल्याने, राष्ट्रवादी चांगलीच खवळली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीने माघार घेतल्याने म्हस्के हे महापौरपदी बिनविरोध निवडून आले आहेत असा टोला लगावीत, कोवीड काळातील शिवसेनेच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली आहे. त्यामुळे राज्यात आघाडी असली तरी सुध्दा ठाण्यात शिवसेना व राष्ट्रवादीची बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे, आता राष्ट्रवादीच्या आरोपाला शिवसेना काय उत्तर देतेय याकडं लक्ष लागलं आहे.
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन का करावं लागलं याचा खुलासा आनंद परांजपे यांनी केला आहे. “ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. अन् ती आम्ही करीत आहोत. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला आहे आणि शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकास निधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता. कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरु असताना सचिवांकडून महापौरांच्या इशार्यावरुन आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहचावा, यासाठी नरेंद्र सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसले होते. महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन होते असे परांजपे यांनी म्हटले आहे .
लसीकरणाच्या चारपैकी दोन बसेस महापौरांच्या अधिकारात
शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून लसीकरण होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लसीसाठी मागणी केली की ती नाकारली जाते. लसीकरणाच्या ज्या चार बसेस आहेत. त्यापैकी दोन प्रशासनाने ठेवल्या आहेत. तर, दोन बसेस महापौरांनी स्वत:च्या अधिकारात ठेवल्या आहेत. त्या बसेसदेखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आल्या नाहीत, म्हणूनच महासभेत हा आक्रोश झाला. मंगळवारी सभागृह नेते अशोक वैती यांनी देखील कोविडच्या कार्यकाळात मोठमोठ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहेत, असा आरोप केला आहे. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत आहेत. आणि सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नाही असा खळबळजनक आरोपही परांजपे यांनी केला आहे. त्यामुळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महासभेत आणि ठाणेकरांसमोर चुकीच्या निर्णयाचा विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला.