मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत शेतक-यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने एक दिवसीय बंद पुकारला होता या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र बंद यशस्वी झाल्याचा दावा तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे दरम्यान बंदमध्ये काही ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी रस्ता रोको जाळपोळ झाली. मात्र बंदवरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले होते मात्र बळीराजाचे दु:ख बाजूलाच राहिले बंद वरून राजकारण पेटल्याचे दिसून आले.
राज्यात सर्वच जिल्हयात बंद पाळण्यात आला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या पदाधिका-यांनी व कार्यकत्यांनी रस्त्यावर उतरून शहरातील दुकाने रिक्षा बंद केला. मुंबईतील धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या बसच्या तोडफोडीच्या घटना घडल्या. मुंबईतील विक्रोळी परिसरात शिवसैनिकांनी ईस्टन एक्सप्रेस हायवेवर टायर जाळल्याने मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कणकवलीत आमदार वैभव नाईक यांनी व्यापा-यांवर दबाव टाकून दुकाने बंद करण्यात आली. तसेच चंद्रपूरात दुकानं बंद करण्यावरून आंदोलनकत्यांनी तरूणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला भुसावळमध्ये दुकान सुरू करण्यावरून मविआचे आणि भाजपचे नेते आपआपसात भिडल्याने भाजपचा नगरसेवक जखमी झाल्याचा प्रकार घडला. शिवसैनिकांकडून दुकानाची तोडफोड करण्यात आली. ठाण्यात शिवसेनेची रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली
बंदला विरोध म्हणजे शेतकरी चिरडण्याला पाठींबा : संजय राऊत
लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे पाळण्यात आलेल्या बंदला भाजप व मनसेने विरोध दर्शविला. याच पार्श्वभूमीर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टीका केलीय. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला
काँग्रेसचे राजभवनावर मौनव्रत आंदोलन
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनावर काँग्रेस नेत्यांकडून मौन व्रत आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या भाजपला आजच्या बंद बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेस नेत्यांनी दिलंय.

हुतात्मा चौकात राष्ट्रवादीची घोषणाबाजी
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्म चौकात आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अन्नत्याग करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष : केशव उपाध्ये
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये 72 तास अन्नत्याग आंदोलन करणारे 72 शेतकरी दिसत नाहीत का, असा खोचक सवाल प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला.लातूर येथे मांजरा धरणाचे पाणी चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही असंख्य शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले. त्यातून सोयाबीन सारखी पिके उद्ध्वस्त झाली. या शेतक-यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 72 शेतकरी 72 तासांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले असून पंचक्रोशीतील गावांनी चूल बंद आंदोलन सुरु केले आहे. एकिकडे शेतक-यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे दाखवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एकाही नेत्याने या गावक-यांना भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तसेच लातूरला अतिवृष्टीला मिळालेली मदत ही शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे असा आरोप उपाध्ये यांनी केलाय.
