विशाळगड :  विशाळगडावरच्या अतिक्रमणावरुन राजकीय वाद सुरु झालाय. जमावानं गडापासून ३ किलोमीटर दूर असलेल्या एका गावात तोडफोड केली. यावरुन एमआयएमच्या जलील यांनी संभाजीराजेंवर तर प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडेंकडे बोट दाखवलं आहे. विशाळगडावरील हिंसाचारावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

विशाळगडावरील अतिक्रमणाचा वाद जुना आहे. पण, याठिकाणी असलेला दर्गा जुना असल्यानं ते अतिक्रमण नाही असं मुस्लीम संघटनांचं म्हणणं आहे. अतिक्रमणासंबंधी जे 6 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत ते सोडून इतर 158 अतिक्रमणं का हटवत नाही? अशी संभाजीराजेंची मागणी होती. त्यासाठी त्यांनी रविवारी 14 जुलैला ‘चलो विशाळगड’ अशी हाक शिवप्रेमींना आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना दिली होती.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपाधीक्षक अप्पासाहेब पोवार उपस्थित होते.

संभाजीराजे आणि पोलिसांमध्ये चर्चा सुरू असताना कार्यकर्ते आणखी मोठ्या संख्येनं जमले. पोलीस गडावर जाऊ देत नसल्यानं गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावाकडे मोर्चेकरी गेले. याठिकाणी घरांवर दगडफेक झाली. घरासमोर लावलेल्या दूचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये एका घराली आग लावण्यात आली होती. तसेच गडाच्या पायथ्याशी काही लहान विक्रेते होते त्यांच्याही साहित्याची नासधूस केली. यामध्ये काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणात कोणावर गुन्हे दाखल झाले?
विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. यामध्ये 400 ते 500 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 21 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!