ग्रामीण पोलिसांच्या १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहनांचे लोकार्पण

ठाणे, दि. १४ : ठाणे जिल्ह्यातील पोलिस दलाला चारचाकी आणि दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामाध्यमातून पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवितानाच गुन्हेगारी कमी करण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ग्रामीण पोलिसांना १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहने वाटप करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा येथील पोलिस कवायत मैदानावर झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.

मंत्री . शिंदे यावेळी म्हणाले, आपला जीव धोक्यात घालून पोलिस सामान्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. सणा-समारंभात ते कुटुंबियांपासून दूर राहून सामान्य नागरिकांच्या रक्षणाला प्राधान्य देत असतात, अशा कर्तव्यदक्ष पोलिसांच्या अडचणी समजून घेतानाच त्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून पोलिस दलाला आवश्यक असलेली चारचाकी आणि दुचाकी वाहने घेण्यात आली.

ठाणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून ग्रामीण भागातील पोलिस दलाला वाहनांची आवश्यकता होती. आज विजयादशी सणाच्या पार्श्वभूमीवर ही वाहना पोलिस दलात सामील होत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्याकामी आणि गस्ती वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या वाहनांच्या मदतीने निर्मनुष्य असलेल्या इमारती, ठिकाणे येथे गस्ती वाढवावी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे आवाहन मंत्री. शिंदे यांनी केले.

पोलिस दल सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध करून देतानाच पोलिसांना वाहने, सीसीटिव्ही कॅमेरे देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.

क्राईम रेट कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, सामान्य नागरिक जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायला येतात तेव्हा त्यांच्याशी सौजन्यपूर्वक वागणूक ठेवावी. पोलिस ठाण्यात अभ्यागत कक्ष तयार करावा, असे आवाहन मंत्री . शिंदे यांनी यावेळी केले.

ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या वाहनांच्या मदतीने गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी यावेळी केले. दसरा सणाच्या आदल्या दिवशी पोलिसांना वाहने मिळाली आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने आज दसरा साजरा झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पोलिस अधिक्षक . देशमाने यांनी सांगितले, राज्य शासनाकडून ठाणे ग्रामीण पोलिसांना यापूर्वी सात चारचाकी वाहने मिळाली असून आज त्यात १८ चारचाकी आणि ३१ दुचाकी वाहनांची भर पडली आहे. ही वाहने ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील ११ पोलिस ठाण्यांना मिळणार असून प्रत्येक पोलिस ठाण्याला चारचाकी दोन वाहने तर दोन ते तीन दुचाकी वाहने उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री . शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. वाहनांचे यावेळी संचलन करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक स्मिता पाटील यांनी आभार मानले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!