मुंबई दि. 20 : पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावा ही दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले होते. परंतु निर्णय झाला नव्हता. मी गृहमंत्री म्हणून सूत्र स्विकारल्यानंतर पोलीस महासंचालक यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्याला संमती देऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे असे प्रतिपादन वजा आठवण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जागवली

सह्याद्री अतिथीगृह येथे पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल संवर्गातर्फे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्या आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पोलीस अंमलदार यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण असला तरी राज्य शासनासाठी हा समाधानाचा क्षण आहे. दुसऱ्यांच्या स्वप्नाचे रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांचे स्वतःचे असे स्वप्न असते, त्यांना भावना असतात. पोलीस हे राज्य शासनाचा कणा आहे. या सर्वांचा कणा ताठ ठेवणे, त्यांचा माणूस म्हणून विचार करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांना पुरेशा सोयीसवलती उपलब्ध करुन देण्यासाठी जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व केले जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पोलीस अंमलदार यांना अधिकारी पदापर्यंत कामाची संधी मिळणार आहे. यामुळे चौकशी अभावी प्रलंबित प्रकरणांचा छडा लावणे तसेच प्रकरणे निकाली काढण्यास गती मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले. या सोहळ्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील पोलीस अंमलदार प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित होते. यावेळी पोलीस अंमलदार रवी गर्जे, मुकेश पाटील, श्री.शेलार, विनिता वाघ, गणेश पलांडे यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!