पोलीस ठाण्यात आता ऑनलाईन तक्रार करा

नाशिक : पोलीस ठाण्यात वारंवार माराव्या लागणा-या चकरा, घटनेचा गुन्हा किंवा तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणारा वेळ यापासून आता सर्वसामान्य नागरिकांना सुटका मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते मंगळवारी महाराष्ट पोलीस दलाच्या ई- पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले़.
www.mhpolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नागरिकांसाठी २३ विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ यापैकी नऊ सुविधांसाठी लॉग ईन आयडी/पासवर्डची आवश्यकता नसून उर्वरीत १३ सुविधांसाठी रजिस्टेशन करून लॉगईन आयडी व पासवर्डची आवश्यकता असणार आहे़ या पोर्टलद्वारे गणपती वा नवरात्रौत्सवाची परवानगीसाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे़. ऑनलाईन तक्रार नोंदविल्यानंतर सदर तक्रारीबाबत पोलिसांनी काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे आणि जर दखलपात्र गुन्हा असेल तर त्वरीत एफआयआर दाखल केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात जावेच लागणार आहे़. विशेष म्हणजे याच पोर्टलवर राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा (एफआयआर), हरविलेल्या व्यक्ती, अनोळखी मृतदेह यांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले़
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!