डोंबिवली, दि,13 : डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दाराजवळ रिक्षा चालकांना मज्जाव केले असताना काही टवाळ रिक्षाचालक रस्त्याच्यामध्येच रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी निर्माण करत असल्याच्या अनेक तक्रारी रिक्षा संघटनांनी केल्या होत्या. त्यावरून डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी स्टेशन बाहेरील परिसराची अचानक पाहणी केली. यावेळी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक समस्येबाबत सूचना केल्या.
डोंबिवली स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे.त्यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणि रिक्षा संघटना अनेक प्रकारचे नियम आणि सूचना करीत असतात. परंतु डोंबिवली पश्चिमेला द्वारका हॉटेलजवळील रिक्षा थांबा आणि महात्मा फुले रोड रिक्षा थांबा येथे नियमांचे पालन न करता काही टवाळ रिक्षाचालक रस्त्याच्यामध्येच रिक्षा उभ्या करीत असतात. हा प्रकार अनेक महिन्यापासून सुरु आहे.
मात्र यावर अद्याप कडक कारवाई झाली नाही. तसेच रात्री १० नंतर रिक्षा परवाना नसलेली उनाड टपोरी मुले मोठ्या आवाजात रिक्षात गाणी लावत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.यावर रिक्षा संघटना आणि प्रामाणिक रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांकडे अनेक तोंडी तक्रारही केल्या होत्या . त्यानुसार डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी पश्चिम स्टेशन बाहेरील परिसराची अचानक रात्री पाहणी केली.
यावेळी रिक्षा युनियनचे पदाधिकारी शेखर जोशी, भगवान मोरजकर, राजा चव्हाण यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते.यावेळी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूक समस्येबाबत सूचना केल्या. नो पार्किंग, पार्किंगचे बोर्ड लावणे, दीनदयाल चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, व्यापाऱ्यांनी फुटपाथवरील अतिक्रमण हटविणे अशा सूचना केल्या. जर वाहतूक विभागाच्या पोलीसांनी या सूचनांचे पालन केले तर डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरात,पंडित दिनदयाळ चौक, विष्णुनगर जुन्या पोलीस ठाण्यासमोर आणि फुले रोड येथे होणाऱ्या रिक्षा चालकांच्या गर्दीतून नागरिकांची सुटका होण्यास मोठी मदत होईल.