घाटकोपर मध्ये पोलिसांची फेरीवाल्यांवर कारवाई
घाटकोपर ( निलेश मोरे ) रेल्वे स्थानक , बस स्थानक , हॉस्पिटल , शाळा या 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी असल्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी रस्त्यावरील अनधिकृत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे . न्यायालयाच्या या आदेशानंतर पालिकेकडून कारवाई करण्याकडे कोणताही प्रतिसाद दिसत नसून पोलीस प्रशासनाला या कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागत आहे . त्यामुळे पोलीस विरुद्ध फेरीवाले असे नवेचित्र समोर उभे राहत आहे . एल्फिस्टन – परेल पुलावरील चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी फेरीवाल्यांना टार्गेट करून रेल्वे प्रशासन आणि पालिकेला 15 दिवसांचा अल्टीमेंटम देऊन खळखट्याक करण्याचा इशारा दिला . तदनंतर मनसेच्या या कारवाई गुंड स्वरूपाची उपमा देत काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांचा मेळावा घेऊन वक्तव्य केल्यानंतर फेरीवाल्यांनी मालाड येथील मनसे विभाग अध्यक्ष संदीप माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला . कारवाईचे सत्र सुरूच असल्याने फेरीवाल्यांनी 1 नोव्हेम्बरला दादर मध्ये मोर्चा आयोजित केला होता मात्र या मोर्चावर मनसे कार्यकर्त्यांनी बटाट्याचा मारा करून फेरीवाल्यांचा मोर्चा रोखला . कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाने झटपट निर्णय घोषित केला . रेल्वे स्थानक , बस स्थानक , हॉस्पिटल , शाळा यांच्या 150 मीटर परिसरात फेरीवाल्याना बंदी आणली असून सरकार फेरीवाल्यासाठी फेरीवाला क्षेत्र आखत आहे . मात्र न्यायालयाचे आदेश येऊन देखील घाटकोपर एम जी रोड , जे.पी.रोड , फूटपाथवर फेरीवाले उठण्यास तयार नसल्याने मनसे कार्यकर्त्यांकडून कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी आज घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय मेमाने यांनी अधिकाऱ्यासह फेरीवाल्यांवर कारवाई केली यावेळी पोलिसांनी फेरीवाल्यांचा माल ताब्यात घेऊन पोलीस बिट मध्ये जमा केला . यावेळी पोलिसांनी फुटपाथवर स्टोल बांधून बसणाऱ्या धारकांचे परवाने देखील तपासून पाहिले . यामध्ये स्टोल धारकांनी परवानेसाठी पालिका अधिकाऱ्याकडे अर्ज केल्याचे आढळून आले .