नवी दिल्ली, 11 डिसेंबर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी 2 दिवस प्रतीक्षा केली असती. तसेच युद्धविराम झाला नसता तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) निर्माण झालाच नसता अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. राज्यसभेत सोमवारी जम्मू-काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023 वर चर्चेदरम्यान गृहमंत्री बोलत होते.
कलम 370 वर अमित शहा म्हणाले, स्वातंत्र्यानंतर हैदराबादमध्ये काश्मीरपेक्षाही मोठी समस्या होती, नेहरू तिथे गेले नाहीत. नेहरू जुनागड, लक्षद्वीप, जोधपूर येथे गेले नाहीत. त्यांनी फक्त काश्मीरचे काम पाहिले आणि तेही अर्धवट सोडले. जम्मू- काश्मीरच्या विलीनीकरणाला उशीर का झाला ? असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला. विलीनीकरणादरम्यान शेख अब्दुल्ला यांना विशेष स्थान देण्याची विनंती करण्यात आली होती त्यामुळे विलिनीकरणाला विलंब झाला. एवढ्या राज्यांचे विलीनीकरण झाले, पण कुठेही कलम 370 का लागू केले नाही. ही अट कोणी घातली आणि ती कोणी मान्य केली, याचे उत्तर देशातील जनतेला द्यावे लागेल. या प्रश्नापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही असे शाह यांनी सांगितले.
जम्मू-काश्मिरात 1947 मध्ये सैन्य पाठवण्यास 2 दिवसांचा विलंब झाला. सरदार वल्लभभाई पटेलांच्या विनंतीनंतर नेहरुंनी काश्मीरमध्ये सैन्य पाठवले. हे मी म्हणत नाहीय, तर नेहरू मेमोरिअलमधील पुस्तकात नेहरुंनीच काश्मीरमध्ये झालेली चूक मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रात जाण्याची चूक त्यांनी केली. चुकीच्या कलमाखाली संयुक्त राष्ट्रात गेले, त्यामुळे नुकसान झाले. जम्मू-काश्मीरमध्ये ठराविक कुटुंबं सरकार चालवत होती, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.हा हिंदू-मुस्लिमचा विषय नाही. काँग्रेसवर निशाणा साधत अमित शहा म्हणाले की, पराभवात विजय शोधण्याची कला काँग्रेसकडून शिकली पाहिजे. आज सुप्रीम कोर्टाने कलम 370 हटवल्याचा निर्णय योग्य ठरवला, पण काँग्रेस तो निर्णय चुकीचा ठरवत आहे. काँग्रेसला वास्तव समजून घ्यावे लागेल, हा हिंदू-मुस्लिमाचा विषय नाही. काश्मीरपेक्षा गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, पण तिथे फुटीरतावाद नव्हता. काश्मीरमध्ये कलम 370 असल्यामुळे फुटीरतावाद तयार झाला. फुटीरतावादामुळेच तिथे दहशतवाद फोफावल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला.हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत त्याचे स्वागत केले. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. काँग्रेस अजूनही कलम 370 हटवण्याला चुकीचे म्हणत आहे. काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील योग्य मानत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.