मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियातून करण्यात येणाऱ्या दाव्यात असेही म्हटले आहे की, दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानातील कराचीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून दाऊदवर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दाऊद इब्राहिमनं मुंबईत १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. तोच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधर आहे. या स्फोटांमध्ये २५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतानं त्याला मोस्ट वॉटेंड दहशतवादी घोषित केलं.
दाऊद इब्राहिम आणि त्याची डी-कंपनी अजूनही मुंबईतील अनेक गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवतात, ज्यात ड्रग्ज, शस्त्रास्त्रे, बनावटगिरी इत्यादींचा समावेश आहे, असे ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) च्या 10 व्या आवृत्तीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्हेगारी संघटनेचे अल-कायदासह जागतिक दहशतवादी गटांशी मजबूत संबंध असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.