ठाणे दि.९ : जिल्ह्यात २०८२ हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड झाली असून १३२५ हेक्टर क्षेत्रावर वरी पिकाची पेरणी झाली आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यासाठी नागली आणि वरी या पिकावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलीआहे. या दोन्ही पिकांची निवड एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांचे १४८ लक्षांक प्राप्त झाले असून आता पर्यंत ५८ प्रस्ताव या योजनेच्या पोर्टलवर सादर करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांनी भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.
अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित विविध समस्यांच्या निराकरणासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना राबविली जात असून या योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातील नागली आणि वरी पिकाची निवड करण्यात आली आहे. या पिकांच्या उत्पादनावर आधारीत वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वंयसहाय्यता गट, सहकारी उत्पादक संस्था, महिला आदि या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यांना योजनेंतर्गत एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के अथवा जास्तीत जास्त १० लाखा पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नागली, वरी उत्पादकांना सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शहापूर येथे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. नागली आणि वरी ही पिके, आदिवासी शेतकरी बांधव मोठया प्रमाणावर घेत असल्याने या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे माने यांनी सांगितले.
योजनेच्या http://pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकचे कृषी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
000000