मोदींच्या हस्ते ३८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन
मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकारणं तापू लांगल असतानाच, गुरूवारी पतंप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले. मोदींच्या हस्ते ३८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे लोकापर्ण आणि भूमिपूजन पार पडला. बीकेसी येथील सभेत पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाची सुरूवात केली. मोदी यांनी आपल्या भाषणात मुंबईच्या विकासासाठी पैशाची अजिबात कमतरता पडू देणार नसल्याचं आश्वासन यावेळी दिलं. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळत आहे असे सांगत मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात काही काळासाठी विकास कामं धीम्या गतीने सुरू होती, पण राज्यात शिंदे फडणवीस डबल इंजिन सरकार येताच विकास कामांना गती मिळाली . मुंबईतील मनपाकडे खूप पैसा आहे, पण त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा. फक्त बँकामध्ये पैसा पडून काय उपयोग? त्याचा वापर जनतेसाठी व्हायला हवा. भ्रष्टाचार होणार असेल तर शहराचा विकास होऊ शकत नाही, असं सांगत यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आगामी काळात मुंबईच्या विकासासाठी पैशाची अजिबात कमतरता पडू देणार नसल्याचं मोदी यांनी आश्वासन दिलं.
आज देशभरात रेल्वे आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी यांच्यावरही काम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायपालट होणार आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, कामाला येणं-जाणं सोपं व्हावं. फक्त रेल्वेचाच नव्हे तर मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटीने मेट्रो, बस आदी सेवांचा उपयोग करता येईल. अशीच कनेक्टिव्हिटी इतर शहरांमध्येही तयार करण्यात येईल. मुंबईचा विकास करायचा असेल तर मग देश आणि राज्य पातळीबरोबर स्थानिक पातळीवरही तसंच विकासाचं व्हिजन असलेलं प्रशासन हवं असंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान स्वनिधी उपक्रमाअंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच, ‘तुम्ही दहा पावलं चाला मी अकरा पावलं चालतो’, असे आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी फेरीवाल्यांना दिले. “पंतप्रधान स्वनिधी योजना ही केवळ फेरीवाल्यांना कर्ज देण्यासाठी नाही, तर त्यांचे आर्थिक बळ वाढवणारी आहे. ही स्वनिधी योजना फेरीवाल्यांसाठी स्वाभिमान आहे. मला सांगण्यास आले की, स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना डिजीटल पेमेंटच्या ट्रेनिंगसाठी सव्वा तीनशे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेऊन फेरीवाल्यांनी डिजीटल पेमेंटची सुरूवात केली आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींचा मेट्रोतून प्रवास …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो २ अ (दहिसर ते अंधेरी पश्चिम, डीएन नगर) मार्गिकेतील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेतील गोरेगाव पूर्व ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले.यावेळी पंतप्रधान मोदींनी गुंदवली ते मोगरा मेट्रो स्थानक असा मेट्रो प्रवास केला. मेट्रोने दहिसर ते अंधेरी प्रवास केवळ ३५ मिनिटात करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे ट्रिपल इंजिनचे सूचक वक्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सहा महिन्यांत हे सरकार एवढं काम करतंय, तर पुढच्या दोन वर्षांत किती काम करेल, या विचाराने काही लोकांची धडधड वाढलीये, अस्वस्थता वाढली असं सांगत नाव न घेता उध्दव ठाकरेंवर टीका केली. मुंबईचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील तीन वर्षात मुंबईचा कायापालट करण्याचा प्रयत्न आम्ही करु. काही दिवसांतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यावेळी विकासाच्या या डबल इंजिनला ट्रिपल इंजिनमध्ये बदलू, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रयांच तिसरं इंजिन मनसेचं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नाव न घेता उध्दव ठाकरेंवर टीका केली. काही लोकांच्या बेईमानीमुळे जनतेच्या मनातील सरकार बनू शकलं नव्हतं. पण बाळासाहेबांचे सच्चे अनुयायी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवल्यामुळे लोकांच्या मनातील सरकार पुन्हा येऊ शकलं. त्यामुळेच महाराष्ट्राचा विकास आता वेगाने होऊ लागला आहे असं फडणवीस म्हणाले.