नागपूर : देशात शॉर्टकटच्या राजकारणाची विकृती वाढत आहे. या विकृतीपासून सावधान करु इच्छित आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्ट कट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासनं देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचं निर्माण करु शकत नाहीत,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विरोधकांवर निशाना साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकपर्णा यांच्यासह विविध विकास कामाचं उद्घाटन पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरूवात केली. आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण गणेशाचे पूजन करतो, नागपूरात आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन करतो. मोदी पुढे म्हणाले की, शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे”.पायाभूत सुविधांना एक मानवी स्पर्श देणारं सरकार सध्या देशात आहे. पायाभूत सुविधांना फक्त निर्जीव रस्ते आणि फ्लायओव्हरपुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. याचा विस्तार फार मोठा आहे असंही ते म्हणाले. इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. एक काळ होता साऊथ कोरिया गरीब देश होता, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हा देश पुढे गेला आहे. असे सांगीत मोदी यांनी साऊथ कोरिया आणि सिंगापूरचे उदाहरण दिलं.
महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा प्रकल्प- एकनाथ शिंदे
“समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण केवळ स्वप्नपूर्तीचा नाही; तर आनंदाचा, अभिमानाचा आणि गर्वाचाही आहे. या महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं गेलंय याचाही मला आनंद आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उद्घाटन सोहळ्यात बोलताना म्हटलं. भूमिअधिग्रहणात अडचणी आणण्याचे प्रयत्न झाले. पण आम्ही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळतील हा विश्वास दिला आणि विक्रमी वेळेत जमिनीचं अधिग्रहण पूर्ण केल्याचंही शिंदेंनी सांगितलं. “हा इको फ्रेंडली रस्ता आहे. हा पूर्ण ग्रीन कॉरिडॉर आहे. हा केवळ हायवे नाही, तर गेम चेंजर प्रकल्प आहे. हा महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा नवीन प्रकल्प ठरेल. या हायवेच्या दोन्ही मार्गावर आम्ही इंडस्ट्रीअल हब तयार करण्याचा विचार करत आहोत असेही शिंदे यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकापर्ण