साडेचार वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्याणात सभा
कल्याण : ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो टप्पा क्र ५ च्या मार्गिकेचे भूमिपुजन मंगळवार १८ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर मोदींची जाहिर सभा होणार आहे. त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी मोदी कल्याणात आले होते आता साडेचार वर्षानंतर फडके मैदानावर त्यांची सभा होाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून २००४ साली मुंबई मेट्रो मार्गाच्या आराखडयास आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या टप्प्यांना मान्यता देण्यात आली होती. ठाणे मेट्रो ४ या ३२ किमी वडाळा ठाणे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपुजन करण्यात आले होते आता कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचे मंगळवारी भूमिपुजन करण्यात येणार आहे. कल्याण मेट्रो ५ ची लांबी २४. ९ किमी असून या मार्गावर १७ स्थानके आहेत. या प्रकल्पात किमान सव्वा तीन हेक्टर खासगी जमीन संपादीत करावी लागणार आहे. कार डेपोसाठी १५ हेक्टर बांधकामासाठी ६ हेक्टर जमीन लागणार आहे तर खासगी ३ २५ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ८ हजार ४१६ कोटी रूपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या तयारीला आता वेग येताना दिसत आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आपापल्या कामांचा आढावा घेत असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षस्तरावरही या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजप कल्याण जिल्हा पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठका घेण्यात सुरवात केली आहे 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात येत असून कासारवडवली-भिवंडी- कल्याण या मेट्रो 5 चे भूमिपूजन तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या 90 हजार घरांचे आदी प्रमुख विकास प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. तसेच लालचौकीजवळील फडके मैदानात त्यांची जाहीर सभा होणार असून त्याला भाजपचे 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक घेण्यात येत असल्याचेही राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.