मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे मुंबई महानगरातून लुप्त होणाऱया अनेक देशी प्रजातीच्या झाडांची छाया मुंबईकरांना पुन्हा मिळावी यासाठी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाद्वारे लवकरच या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० ठिकाणी या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. या झाडांमध्ये काही फळझाडेदेखील आहेत.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने झाला. या अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ९ ठिकाणी ‘अमृत-वाटिका’ साकारण्यात आली आहेत. प्रत्येकी एका अमृत-वाटिकेत ७५ देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात काही फळझाडे देखील आहेत. त्यानंतर आता उद्यान विभागाने हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतून लुप्त होणाऱ्या देशी प्रजातीच्या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांना या दुर्मिळ झालेल्या झाडांच्या सावलीचाही आनंद घेता येणार आहे.

मुंबई महानगर जसजसे वाढत जात आहे, तसतसे या महानगरातील अनेक देशी प्रजातीची झाडे दिसेनाशी होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी आणि मुंबई सतत हरित रहावी, मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात देशी प्रजातीच्या झाडांच्या बियांपासून रोपे तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

या देशी झाडांमध्ये आवळा, बेल, शिकेकाई, पळस, अंजन, शेवर, रिठा, बेहेडा, चिलार, करंज, खैर, शिशम, आपटा, चंदन, रक्तचंदन, काटे बाभळ, बकुळ, कण्हेर, हिरडा, महोगणी, शेवर, सागरगोटा, कवठ, भोकर, शमी, वड आदी झाडांची रोपं सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात तयार करण्यात येत आहेत. सध्या या झाडांच्या बियांपासून रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर ११०० ठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आपल्या अवतीभवती ही दुर्मिळ झाडे बहरलेली दिसतील.

===

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *