कल्याण दि.9 ऑक्टोबर : कल्याण शीळ रस्त्या येथील एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याचा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पून्हा जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण – शिळ रस्ता जलमय झाला होता.
आज सकाळच्या सुमारास देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. ज्याठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे त्या परिसरात अक्षरशः पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हजारो लीटर पाणी वाया गेले.
कल्याण शिळ मार्गावर पाणीच पाणी साचल्याने वाहनांना त्यातूनच वाट काढावी लागली. तर इथल्या रस्त्याला नदीचेच स्वरूप आले होते, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस वाहतूक घटनास्थळी पोहचल्याने वाहतूक केांडी झाली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण शिळ रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सातत्याने घडणाऱ्या जलवाहिनी फुटण्याच्या घटना थांबणार तरी कधी असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.